सिंहगड माझा सखा


आज २०१९ वर्षाखेर.. या वर्षातील  कदाचीत आजची विसावी वेळ सिंहगड ट्रेकिंग ची. आज सकाळी बऱ्यापैकी धुकं होते. गाडी चालवताना पण त्रास होत होता..विशेषतः खडकवासला पट्टयात धुक्याची चादर दाट होती. तशी रस्त्यावर विशेष गर्दी पण नव्हती..

पायथ्याला उतरलो .. .. पहाट निघण्याची तयारी करत होती.. थांब सखे, म्हणत दिवसाचे दूत पूर्वेला अजून ललकारी द्यावयाचे होते.. नी एकदम मला आठवण झाली माझ्या मोबाईल मधील नाईट मोडमध्ये फोटो  काढण्याच्या बटणाची. सुंदर फोटो काढून झाले.. स्वानंद म्हणजे माझा मुलगा नी मी असे दोघेच होतो आज.. स्वानंद म्हणजे चढाई चे टार्गेट.. कमीत कमी वेळात गड सर करायचा. एक एक मिनिटाचा हिशोब ठेवतो तो.
तो आधी पोहचणार याची खात्री असल्याने त्याला जवळ थोडे पैसे दिले नी वर जावून सरबत पिण्यास सांगितले.

आज का कोण जाणे आकाश नुसते वेगवेगळे रंग उधळत होते.. नुसता जल्लोष... कदाचित सरत्या वर्षाला प्रेमाने निरोप नी नव्या आशेच्या उद्याच्या सूर्याला आदरपूर्वक आवाहान.  क्षणाक्षणाला रूप पालटत होते आकाश स्वतःचं. आजचा हा कॅलिडोस्कोप फारच अप्रतिम होता..

थोड रेंगाळत, कधी थोड वेगाने , अशी वर कुच चालली होती. स्वानंद आधी पोहचला होता. वरच्या दही विकणाऱ्या आजींनी त्याला ओळखले..' एकटाच आलास का रे , तुझे बाबा कुठे आहेत? '
नाती अशीच तयार होतात का...कळत नकळत... माहित नाही..

वर जावून जरा टेकलो... तोच आनंद.. तेच समाधान..लोकं विचारतात, ' गडावर असे काय आहे.. की त्या पाच मिनिटाच्या समाधानासाठी एवढी दमणूक करून घ्यावयाची? पहाटे उठा, गड चढा...'
त्यांना काय सांगणार, 'काही गोष्टी ह्या मायक्रोसॉफ्ट Excel PPT पेक्षा वेगळ्या असतात...निराळ्या असतात.. त्यांना मोजता येत नाही...'

सरबत पिवून झाले. दही खावून झाले.. नी नेहमी प्रमाणे राजगड नी तोरणा दिसतात का हे बघण्यासाठी गाडी तळा कडे गेलो.. नी काय सांगू.....

आज जो तोरणा नी राजगड दिसला...त्याला तोड नाही.. अतिशय स्वच्छ वातावरण.. मगाचं धुकं गायब झालेले.. समोर जणू स्वर्ग होता..  शुभ्र ढगांची दुलई. मधून गुलाबी छटा.. वर नेत्र सुखदायी शांत आकाशी रंगाचे आकाश. आणि त्यातून दिसणारे ते साक्षात भगवंत दर्शन.. एक नाही तर चक्क दोन...राजगड नी तोरणा.. उर भरून यावा म्हणजे काय याची प्रत्यक्ष अनुभूती.. जगण्याच्या वाटेवरील काही नितांत मनोहारी क्षण.. वेचता येत नाहीत असे हे सौदर्य..
मोबाइल टिपून तो टिपून, काय टीपणार.. 10एक्स झूम..बास..

आज तोरणा नी राजगड इतके लख्ख दिसत होते की, अगदी तोरण्या वरील बुधला माची काय की, सुवेळा वरील हत्तीच्या आकारा ची टेकडी.. बालेकिल्ला अगदी पुढ्यात आहेत असा भास होत होता.. काळया पाषाणाला पण एक ठसठशीत सौदर्य असते..याची आज पुरेपूर जाणीव होत होती..एवढं मात्र खरं की, आपली नजर मात्र तशी लागते.. नाहीतर त्या पंढरीच्या ओबडधोबड मूर्तीला.. सावळे सुंदर रूप मनोहर असे उगीच म्हणले असते का कोणी...

 आजच्या ह्या क्षणाला सोबत होते राजगड नी तोरणा, हे दोन साक्षीदार ....आणि त्याला साथ देत होता तो माझा, आमचा ...आपला सिंहगड!!
पहाट


पूर्वेची लाली

रंगांची उधळण




तोरणा आणि राजगड

तोरणा

Comments